जव्हार/मोखाडा : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांची जमा असलेला १११ कोटी ६३ लाखांचा निधी हा खोटा धनादेश आणि बनावट सह्यांच्या मदतीने हडपण्याचा डाव एसबीआय शाखा जव्हारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे उधळला आहे.
शुक्रवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी जव्हार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक तथा विक्रमगडचे विद्यमान नगराध्यक्ष नीलेश ऊर्फ पिंका पडवळे यांना अटक करण्यात आली.
बँक धनादेश प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचासुद्धा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर त्यालादेखील अटक करण्यात आली.
जव्हार संशयित आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पडवळे यांचा थेट सहभाग या प्रकरणात उघडकीस आला. त्यांच्यासोबतच या प्रकरणात यज्ञेश अंभिरे यालाही अटक करण्यात आली. अंभिरे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी नसून त्याला तात्पुरते कार्यालयात काम देण्यात आले होते. त्याचा पगारही पिंका पडवळे देत होता.
बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे प्रकरण उघड
बँक अधिकाऱ्यांनीही धनादेशावरील शिक्के, दिनांक आणि सह्या संशयास्पद असल्याचे ओळखून व्यवहार रोखला आणि पोलिसांना माहिती दिली. एसबीआय शाखेचे व्यवस्थापक संजय कुजूर आणि कर्मचारी राहुल सोनवणे यांनी हे प्रकरण उघड केले. त्यांच्या तत्परतेमुळे शेकडो कोटींचे सरकारी नुकसान टळले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी शुक्रवारी रात्री जव्हार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची अधिकृत नोंद झाली.
चौकशीसाठी आल्यानंतर संशय बळावला…
खोटी सही व हस्ताक्षर असलेला धनादेश डिमांड ड्राफ्टसाठी यज्ञेश अंभिरे हा बँकेत घेऊन गेला होता. मात्र, तो न वठल्याने त्याच्या चौकशीसाठी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक संशयित नीलेश पडवळे व इतर दोघे बँकेत आले होते, असे बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.


