मीरारोड- अनधिकृत बांधकामांच्या राजकीय आणि प्रशासकीय साटेलोट्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणात खंडणी उकळणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. भाईंदरच्या एका सरकारी जागेत होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करून खंडणी उकळणाऱ्या व आणखी खंडणीची मागणी करून कारवाईची धमकी देऊन घर बांधणाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांवर भाईंदर पोलिसांनी खंडणी, मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पश्चिमेस शास्त्री नगर ही सरकारी जागेतील अनधिकृत झोपडपट्टी आहे. सदर झोपडपट्टीत जोगिंदर प्रजापती यांचे पक्के घर असून ते त्यांनी भाड्याने दिले आहे व ते स्वतः उत्तर प्रदेशमधील गावी राहत होते. सदर घर दुरुस्ती व पहिला मजला अनधिकृतपणे बांधायला घेतला. त्याचे काम कंत्राट बांधकाम ठेकेदार शकील खान याने घेतले होते. घराचे काम म्हणून प्रजापती हे गावावरून भाईंदरमध्ये आले होते.
बांधकाम सुरु असताना किरण ए के आणि त्याची पत्नी यांनी आम्ही पत्रकार असल्याचे धमकावून फोटो – व्हिडीओ काढून महापालिका व विभागाकडे तक्रारीची धमकी देत ५० हजारांची खंडणी मागितली. त्यातील ५ हजार रुपये त्यांनी घेतले. मात्र उर्वरित पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने तक्रार करून पहिल्या मजल्याचे बांधकाम तोडायला लावले.
शकील खान यांनी परत वाढीव बांधकाम सुरु केल्यानंतर पुन्हा किरण एके हा पत्नीसह आला आणि व्हिडीओ – फोटो काढून तक्रार करून पुन्हा बांधकाम तोडायला लावीन अशी धमकी देत १ लाख रुपयांची मागणी केली.
शकील व प्रजापती यांनी आपसात चर्चा करून २५ हजार रुपये देण्याची तयारी दाखवली मात्र किरण याने १ लाखच हवेत असे सांगितले. बुधवारी किरण हा पत्नीसह पुन्हा बांधकाम ठिकाणी आला. ते समजल्यानंतर प्रजापती यांनी शकील याला कळवले.
आरोग्य भवन येथे भेटायचे ठरले व प्रजापती हे तिकडे थांबलेले होते. त्याचवेळी ते चक्कर येऊन खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात संताप उसळला. ठेकेदार शकील याच्या फिर्यादीनंतर किरण एकेसह त्याची पत्नी, कौशल दुबे आणि रॉबर्ट यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.
आरोपी हे पसार झाले असून पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर तपास करत आहेत.


