मुंबई/उरण : उरण-नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील लोकल सेवांचा विस्तार लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. नेरूळ-उरण-नेरूळ ४ आणि बेलापूर-उरण-बेलापूर ६ अशा एकूण १० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. तरघर आणि गव्हाण ही नवी स्टेशन मंजूर झाल्याचेही सांगितले. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असून, त्यासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उरण, जासई, उलवे यांसारख्या भागातून नेरूळ, बेलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अधिक लोकलची गरज निर्माण झाली आहे. सध्या या मार्गावर सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९:५५ वाजेपर्यंत एकूण ४० फेऱ्या होतात.
मात्र, सकाळी व संध्याकाळच्या दरम्यान लोकल सुमारे एक ते दीड तासाच्या अंतराने सोडण्यात येतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय या मार्गावरील रखडलेल्या तरघर व गव्हाण या दोन्ही स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबा सुरू करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे.


