सोलापुर : एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधातून धोका मिळाल्याने प्रकाश व्यंकप्पा कोळी उर्फ स्वीटी (वय, २२) या तृतीयपंथी व्यक्तीने गुरुवारी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वीटीचा प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार (वय, २३) याला पोलिसांनी हळदीच्या मंडपातून अटक केली.
स्वीटी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेला सुजित जमादार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. दोघे काही महिने भाड्याच्या घरात एकत्र राहत होते, ज्याचे भाडे सुजितच भरायचा. मात्र, सुजितने अचानक दुसऱ्या डी-फार्मसीच्या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वीटी मानसिकदृष्ट्या खचली आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वी स्वीटीने रडत रडत एक व्हिडिओ बनवला आणि तो जवळच्या लोकांना पाठवला. या व्हिडीओत स्वीटी म्हणत आहे की, तिच्या मृत्युला फक्त सुजित जमादार हा तरूण जबाबदार असेल. सुजितने तिच्याशी लग्न केले. प्रेमाचे खोटे नाटक केले. आठ वर्षे त्याच्यासोबत राहिला आणि आता मला धोका दिला.
स्वीटीच्या आत्महत्येनंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि धक्कादायक सत्य समोर आले. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी कोणतीही दयामाया न दाखवता, विवाहाच्या तयारी सुरू असलेल्या हळदीच्या मंडपातून सुजित जमादारला अटक केली. त्याला आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


