नंदुरबार / सप्त नगरी न्युज
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाची सांगता आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
उमर्दे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पंचअग्नी आखाड्याचे महंत सोमेश्वरानंदजी ब्रम्हचारी यांच्या आशीर्वादाने व आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबरला सप्ताहास सुरुवात झाली.
तसेच १५ डिसेंबरला मार्गशीर्ष वद्य एकादशीला विठ्ठल मंदिरात वेदमूर्ती शाम प्रेमचंद मुळे यांच्या मंत्रोच्चार ने श्री गणपती, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कृष्णा भिला जमादार व भुषण धनराज बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला.
काल्याच्या कीर्तनानंतर माजी सरपंच सागर मराठे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदानानंतर रक्तदात्यांना भेट म्हणून पाण्याच्या जार देण्यात आले. नंदुरबार येथील सेवा ब्लड सेंटरच्या डॉ. सुपी पगारे, महेश नांद्रे, सागर पिंपळे, करण चव्हाण यांनी रक्त संकलनासाठी मदत केली. सदरील कार्यक्रमात परिसरातील विखरण, कलमाडी, सिंदगव्हाण, वडवद, भालेर, चौपाळे, रजाळे निघेल, मोहिया (क.स), रांजणी, असाणे यादी गावातील भजनी मंडळे सप्ताहात सहभागी झाली होती.श्री विठ्ठल रुक्माई ट्रस्ट, ह.भ.प. भजनी मंडळ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, भातोको महाराज भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ आदींचे सहकार्य लाभले. धार्मिक सोहळा आणि सामाजिक उपक्रम (रक्तदान शिबिर) यांच्या संयोगाने हा सप्ताह यशस्वीरित्या पार पडला.






