जुने लेख

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या हॉकी संघाची राष्ट्रीय पातळीवर निवड!

 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या हॉकी संघाची राष्ट्रीय पातळीवर निवड!

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS), नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याने नंदुरबार जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय एकलव्य शाळांच्या क्रीडा स्पर्धेत या शाळेच्या मुलांच्या आणि मुलींच्या हॉकी संघांनी प्रभावी कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे.

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी तथा आदिवासी विकास विभाग, आयुक्तालय, नाशिक यांच्या मार्फत दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील 37 एकलव्य शाळांमधील तब्बल 2800 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये नंदुरबारच्या संघांनी उत्कृष्ट समन्वय, जिद्द आणि खेळाडूपणा दाखवून हॉकी प्रकारात राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले.

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारचे मुलांचे आणि मुलींचे हॉकी संघ यांची राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी तसेच मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक (महाराष्ट्र राज्य) श्रीमती लीना बनसोड यांनी अभिनंदन व्यक्त केले असून, मा. उपायुक्त विनिता सोनवणे, मा. सहआयुक्त अनिता दाभाडे, मा. प्राचार्य  सतीश श्रीराव, क्रीडाशिक्षक श्री. सौरभ पांडे, गुरमीत मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हा यशाचा प्रवास केवळ शाळेचा नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा आणि क्रीडास्पृहेचा गौरव करणारा आहे.

.

.

.

#Nandurbar #EMRS #TribalEducation #HockeyChampions #NashikSports #AdiwasiVikas #DistrictPride #SportsForChange #CollectorOfficeNandurbar #YouthEmpowerment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *