भंडारा : मोहाडी तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घोरपड येथील तरुण आणि दुधाळा (ता. मौदा, जि. नागपूर) येथील तरूणीने प्रेमात अडसर निर्माण झाल्याने विष घेतले. यात तरूणाचा मृत्यू झाला तर, तरूणीही गंभीर आहे.
पुनीत नरेश भालावीर (२५) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ रात्री वाजता उघडकीस आली. १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुनीत कुणालाही न सांगता घरून प्रेयसीला भेटण्याकरिता दुधाळा (जि. नागपूर) येथे गेला, त्यानंतर दोघांनीही विष घेतले.
तरुणीचे नुकतेच लग्न जुळले होते. तरुणाला माहीत झाल्यावर तरुणाने तिला भेटण्याच्या प्रयत्न केला. तरुणी सध्या मामाच्या घरून शिक्षण घेत होती. तिला भेटण्याकरिता पुनित मध्यरात्री गेला, याची तिकडेही कुणाला कल्पना नव्हती. विष घेण्यापूर्वी दोघांमध्ये नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
तरुणीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर घटनास्थळ मौदा तालुक्यात येत असल्यामुळे सदर घटनेची नोंद आरोली पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृत तरुणाचे शव शवविच्छेदनाकरिता मौदा येथील रुग्णालयात पाठविले. त्यानंतर २० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता पुनीतच्या पार्थिवावर घोरपड येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


