बुलढाणा

आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले

बुलढाणा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी सुरू असलेल्या मतदानादरम्यान बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा आणि आयटीआय मतदान केंद्रांवर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बोगस मतदान करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्याला चोपही देण्यात आला होता. परंतू, याचवेळी आमदार पुत्राने पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून ठेवत या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी याप्रकरणी थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा पूत्र आणि उमेदवार कुणाल गायकवाड तसेच आमदारांचा पुतण्या श्रीकांत गायकवाड यांनी बोगस मतदान करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचे काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रण केले असून ते समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमध्ये आमदाराचा मुलगा कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड हे बोगस मतदारास पळून जाण्यास मदत करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा शिंदे यांनी केला आहे.

आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते… pic.twitter.com/EV0b8q8KRB

— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 2, 2025
भाजप जिल्हाध्यक्षांची मागणी
बोगस ओळखपत्र बनवून मतदान करण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे आणि बोगस मतदारास पळून जाण्यास मदत करणे, अशा गंभीर गुन्ह्यांसाठी दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *