जालना

शेतातील रस्त्याचा वाद, नायब तहसीलदारांच्या टेबलावर शेतकऱ्याने पैसे फेकले

बदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील हलदोला येथील दोन शेतकऱ्यांमध्ये शेतात जाण्याचा रस्त्याचा वाद असून याबाबत नायब तहसीलदारांनी पैसे मागितल्याचा आरोप करत शेतकऱ्याच्या मुलाने नायब तहसीलदारांच्या टेबलवर पैसे आणून टाकले. परंतु, नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी याबाबतचा आरोप फेटाळत पैशाची मागणी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तालुक्यातील हलदोला येथील श्रीहरी जनार्दन मात्रे यांनी हलदोला शिवारातील गट क्रमांक २०३ मधून २०४ मध्ये जाण्यासाठी रस्ता देण्याची मागणी केली होती. ३० मे २०२५ रोजी रस्ता देण्याबाबत आदेश पारित केला होता. त्यानंतर नारायण ज्ञानदेव मात्रे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे याविषयी अर्ज दाखल केला होता. उपविभागीय अधिकारी यांनी अर्ज येथील तहसील कार्यालयात पुनर्विलोकनासाठी पाठविला होता. त्या अनुषंगाने ४ डिसेंबर रोजी येथील नायब तहसीलदार अतुल बने यांच्याकडून त्या शिवारात स्थळ पाहणी करण्यात आली. दरम्यान, शेत रस्त्याबाबत निर्णय लागत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाने मंगळवारी येथील नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांच्या टेबलवर पैसे फेकले. रस्ता मिळत नसल्यामुळे आपल्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोपदेखील केला.

पैशाची मागणी केलेली नाही
या प्रकरणांमध्ये माझ्याकडे तहसीलदारपदाचा चार्ज असताना मीच या प्रकरणी या शेतकऱ्याला रस्ता देण्याबाबतचा आदेश दिलेला आहे. त्यानंतर सदरप्रकरणी त्यांच्या विरोधी पक्षकाराने उपविभागीय कार्यालयात याबाबत अर्ज केला होता. या प्रकरणी मी कुणालाही पैशाची मागणी केलेली नाही. मी मागणी केली असेल तर तसे त्यांनी सिद्ध करावे. मला याबाबत विनाकारण बदनाम केले जात आहे.
– हेमंत तायडे, नायब तहसीलदार, बदनापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *