शिराळा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुणे येथील नंदिनी जितेंद्र मेणकर हिने जलतरण, ट्रायथलॉन, वॉटर पोलो यांसारख्या अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आतापर्यंत तब्बल ११४ पदकांची कमाई केली. नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या वॉटर पोलोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. यासंघात नंदिनीचा समावेश होता. नंदिनीच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र आणि देशाचे नाव उंचावले आहे. नंदिनीचे आजोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा आहे. उद्या, शुक्रवारी (दि.१२) शिराळ्यात तिचा सत्कार होणार आहे.
बालपणातच सुवर्ण यश!
सहा वर्षांची असतानाच तिने जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकून आपल्या उज्ज्वल भविष्याची नांदी दिली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. शाळा स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत तिने राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली. नागपूर येथील स्पर्धेत ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदक, सोलापूर येथील स्पर्धेत सुवर्ण, कांस्य पदक, सातारा येथील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. पुणे येथील मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धेत (रनिंग-स्विमिंग-रनिंग) तिला कांस्य पदक मिळाले.
ट्रायथलॉन आणि पेंटाथलॉनमध्येही दमदार कामगिरी
जलतरणासोबतच ट्रायथलॉन (रनिंग-स्विमिंग-सायकलिंग) या अत्यंत आव्हानात्मक क्रीडा प्रकारातही नंदिनीने मोठे यश संपादन केले. मॅरेथॉन आणि वॉटर पोलोमध्ये आव्हान स्वीकारले. नंदिनीने ३१ व्या पुणे मॅरेथॉनमध्ये (३ किलोमीटर धावणे) भाग घेतला आणि रौप्य पदक मिळवले.
वयाच्या १६ व्या वर्षी तिने वॉटर पोलो या अत्यंत कठीण सांघिक खेळात प्रवेश केला. ७ ते ८ फूट खोल पाण्यामध्ये हात-पाय हलवून चेंडू पकडणे आणि गोल करणे, यासाठी प्रचंड शारीरिक क्षमता आणि समन्वय आवश्यक असतो. केरळ येथील पहिल्या स्पर्धेत तीने पहिल्याच प्रयत्नात कांस्य पदक जिंकले. उत्तराखंड स्पर्धा (२०२२): १९ वर्षांची असताना, नंदिनीने २५-२६ वर्षांच्या खेळाडूंच्या महाराष्ट्र संघात सहभाग घेतला. -४ अंश सेल्सियस इतक्या थंड पाण्यातील या स्पर्धेत तिच्या संघाने रौप्य पदक मिळवले.


