पुण्यासह महाराष्ट्रात १०३-१०४ रुपयांच्या पुढेच पेट्रोलचे दर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी इंधनाचे दर मात्र कमी झालेले नाहीत. अशातच इथेनॉल मिक्स करून झाले, तरीही सरकारने पैसे कमी केलेले नाहीत. परंतू, आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८६ व्या वाढदिवसाचे निमित्त होते. कोथरूड भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना पेट्रोल वाटप करण्यात आले. पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. दुपारपर्यंत सुमारे ७०० हून अधिक वाहनचालकांनी या सवलतीचा लाभ घेतला.
राजकीय अर्थाची चर्चा:
शरद पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त असले तरी, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाकडे राजकीय प्रचार म्हणून पाहिले जात आहे. सध्या पुणे शहर आणि उपनगरात इच्छुक उमेदवार देवदर्शन, पर्यटन, साड्या वाटप यांसारख्या विविध कार्यक्रमांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोथरूडमधील ‘₹८६ पेट्रोल वाटप’ हा त्याच निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


