जुने लेख

नंदुरबार जिल्ह्यात “आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” अंतर्गत ११० वाचनालयांचे लोकार्पण

 नंदुरबार जिल्ह्यात “आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” अंतर्गत ११० वाचनालयांचे लोकार्पण

                नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ . मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज, सुरक्षित आणि ज्ञानसमृद्ध वाचनालये उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

         गेल्या १ मे – महाराष्ट्र दिनी या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. आज, १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी, या उपक्रमाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या ११० वाचनालयांचे लोकार्पण  मा. पालकमंत्री श्री. माणिकराव कोकाटे (मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले. 

           या वाचनालयांसाठी लागणारे फर्निचर आणि पुस्तके ही जिल्हा वार्षिक योजना  तसेच आदिवासी उपयोजना  यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. प्राधान्याने निवडलेल्या ग्रामपंचायतींतील जुन्या व पडिक सरकारी इमारतींचे नूतनीकरण करून, त्यात मानक फर्निचर, विविध विषयांवरील पुस्तके, नकाशे आणि प्रकाशमान अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे.

       हा प्रकल्प केवळ पुस्तकांची उपलब्धता वाढवण्यासाठी नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे इच्छुक आणि सर्व वयोगटातील वाचकांसाठी ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणेचे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. “अभ्यासिका” ही केवळ वाचनालय नसून गावाच्या बौद्धिक व सामाजिक विकासाचे केंद्रस्थान ठरणार आहे.

आजच्या लोकार्पण कार्यक्रमात ११० ग्रामपंचायतींनी आपल्या “अभ्यासिका”चे उद्घाटन अभिमानाने केले असून, या उपक्रमाच्या यशासाठी ग्रामपंचायत, स्थानिक युवक, शिक्षक आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद श्री. नमन गोयल, उपविभागीय अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी सौ. अंजली शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, तसेच गटविकास अधिकारी उपस्थित होते.

.

.

.

#Nandurbar #AamchiAbhyasika #MitaliSethi #ManikraoKokate #LibraryInauguration #RuralDevelopment #EducationForAll #KnowledgeHub #GramPanchayat #StudentSupport #CompetitiveExamPreparation #BookLovers #MaharashtraDevelopment #NandurbarUpdates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *