जुने लेख

रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्र्यांनी केला गौरव 5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे केले संकलन

 रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्र्यांनी केला गौरव

5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे केले संकलन


           अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयातील एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेश कुवर हे नंदुरबार जिल्ह्यात राबवित असलेल्या रक्तदान चळवळीची दखल घेऊन त्यांचा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला.

       महेश कुवर हे गेल्या 15 वर्षा पासुन अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. महेश कुवर हे एच. आय. व्ही. एड्स या गंभीर आजाराबाबत समाजात, विद्यार्थ्यांत, तसेच समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, यांच्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन एच. आय. व्ही. एड्स या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नियमित काम करत असतांना नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल अनेमिया, थॅलेसिमिया, आदी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते तसेच गरोदर मातां, लहान बालके, अत्यावश्यक स्थितील रुग्ण, नियमित शस्त्रक्रिया आदी प्रकारच्या रुग्णांना तातडीने रक्ताची गरज असते. जिल्ह्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे रक्तदान करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांचे रक्तासाठी मोठया प्रमाणात हाल होत असतात ही बाब हेरुन महेश कुवर यांनी आपली जबाबदारी सांभाळत जिल्ह्यात रक्तादानाची चळवळ सुरु केली यात जिल्हा भरात विविध सामाजिक संघटना, युवा मंडळे, संस्था यांना प्रोत्साहीत करत रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केले. त्यांनी 14 वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात  तसेच लगतच्या गुजरात व मध्य प्रदेश या राज्यात सुमारे 125 पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांचे  आयोजन करुन सुमारे 5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे संकल करुन रक्तदान चळवळीच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्यांनी अक्कलकुवा तालुक्यात एका दिवसात चार रक्तदान शिबिरे तर एका महिन्यात तब्बल 11 शिबीरे  घेऊन शेकडो रक्त बॅगांचे संकलन केले आहे. त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात व इतर ठिकाणी अनेक  रक्त दान शिबीरे आयोजित केली आहेत त्यांनी शहादा येथे रक्त दान शिबीर आयोजित करुन एका दिवसात 300 रक्त बॅगांचे संकलन करुन जिल्ह्यात विक्रम केला आहे तर कोरोनाच्या  काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असतांना त्यांनी त्या काळात सुमारे 1000 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे संकलनाचे काम केले आहे. या रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव केला. यावेळी आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, आरोग्य उप संचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी आदी उपस्थित होते. महेश कुवर यांना सन्माना बद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉ. जर्मनसिंग पाडवी, अक्कलकुवा ब्लड डोनेट गृपचे सुधीरकुमार ब्राम्हणे, रविंद्र गुरव, दिनेश खरात, जि. प. शिक्षक दिपक सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *