राजकारण

“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले

खरेतर स्वार्थी लोक वाढत चालले आहेत. समाज आणि देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होत चालली आहे. आमच्यासारखे काही लोक आहे आणि बलिदान करतील असा मला विश्वास वाटतो. राळेगणमध्ये येथे कोणी झाडाची एक फांदी जरी तोडली तरी मला वेदना होतात. मी कुठेही कोणाला झाडे तोडू देत नाही. कुंभमेळासाठी येणारे साधूसंत हे जंगलात राहणारे असतात. ते काय झाडावर राहतात का? असा संतप्त सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.

२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आतापासूनच वेग आला आहे. साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन परिसरातील ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याची योजना आहे. या कामासाठी १८०० झाडे तोडणे प्रस्तावित आहे. याला स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींचा जोरदार विरोध असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रोष व्यक्त केला.

एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील

साधू संत जंगलात राहतात. ही सगळी विसंगती सुरू आहे. देशाचे दुर्दैव आहे. आज जरी लोक बोलत नसले तरी एक दिवस येईल आणि चीड व्यक्त करत म्हणतील चले जाव. ते दिवस दूर नाहीत. कारण जनता मालक आणि तुम्ही सेवक आहे. म्हणून मालकाला अधिकार असताना मालकाचे अधिकार तुडवणे बरोबर नाही, या शब्दांत अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कुंभमेळा समाज आणि राष्ट्र हितासाठी असला तरी वृक्ष तोडणे कितपत योग्य आहे? वृक्ष तोडल्यामुळे खूप नुकसान होते. वृक्ष तोडल्यामुळे राष्ट्राचे नुकसान होतं, प्राण्यांचे नुकसान होते. मात्र, गरज असेल तर छोटी-छोटी झाडे तोडावी, पण मोठी झाडे तोडू नयेत, असे अण्णा हजारे म्हणाले होते.

दरम्यान, तपोवनात साधुग्रामसाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी एल्गार पुकारला आहे. कोणत्याही परिस्थितीत या परिसरातील एकही वृक्ष तोडू दिले जाणार नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. अभिनेते सयाजी शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तपोवन वृक्षतोडीबाबत विरोध केला आहे. नाशिकच्या तपोवन वाचवा मोहिमेसंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मोहीम व्यापक करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. राज यांनी तपोवन वाचवा मोहिमेला पाठिंबा देत पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची तयारी दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *