धुळे

कांदा भरताना विपरीत घडलं, ट्रक्टरसह ३ चिमुकल्या विहिरीत बुडाल्या, आई-वडिलांचा टाहो!

धुळ्यातील साक्री तालुक्यातील गणेशपूर गावातून एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. गावाजवळील एका शेतात कांदा भरण्याचे काम सुरू असताना, ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या ट्रॅक्टरसह थेट ६० फूट खोल विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, एका चिमुकलीला ग्रामस्थांनी वाचवण्यात यश मिळवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुर्दैवी घटना रविवारी घडली. माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतात ट्रॅक्टरवर कांदा भरण्याचे काम मजुरांमार्फत सुरू होते. काम करणाऱ्या मजुरांची पाच वर्षांखालील तीन मुले ट्रॅक्टर ट्रॉलीवर खेळत होती. अचानक ट्रॅक्टर सुरू झाला आणि कठडे नसलेल्या ६० फूट खोल विहिरीत पडला. ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले.  ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे ऋतिका संदीप गायकवाड (वय, ३) हिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. खुशी दाजू ठाकरे (वय,३) आणि परी संदीप गायकवाड (वय,३) या दोघी पाण्यात बुडाल्या. अथक प्रयत्नांनंतर, रविवारी रात्री उशिरा ११ वाजण्याच्या सुमारास रोहित सरक आणि भैय्या सरक या बंधूंनी विहिरीत पोहून खुशी ठाकरे हिचा मृतदेह शोधून काढला. क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टरही विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तर, परीला शोधण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसले. त्यानंतर काल परीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. या दुर्दैवी घटनेत दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गणेशपूर गावावर शोककळा पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *