रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान फेसबुकवर पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार योगेश हळदवणेकर यांच्यावर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदेसेनेचे उमेदवार निमेश नायर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ मधील अपक्ष उमेदवार याेगेश हळदवणेकर व शिंदेसेनेचे निमेश नायर हे २ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता शहरातील अजिजा दाऊद हायस्कूल येथे समोरासमोर आले होते. मतदाना दरम्यान हळदवणेकर यांनी बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेतला होता. यावरून दोघांमध्ये वाद होऊन निमेश नायर यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याची तक्रार योगेश हळदवणेकर यांनी शहर पोलिस स्थानकात केली हाेती.
या वादाच्या घटनेवरून हळदवणेकर यांनी २ डिसेंबर रोजी सायंकाळी साेशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मतदान प्रक्रिया पार पडत असताना ही पोस्ट केल्याने निमेश नायर यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हळदवणेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२), ३५६ (२), लोकप्रतिनिधित्व अधिनियम १२३ (३अ) व १२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


